दहा रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2017 02:40 PM (IST)
मुंबई : दहा रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात दाखल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात घोषणा केली आहे. सुरक्षेच्या अतिरिक्त बाबींसह नव्या नोटा चलनात दाखल होतील. गेल्या वर्षी 8 ऑक्टोबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तत्कालीन नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांची नोट आरबीआयने व्यवहारात आणली. त्यानंतर सुरक्षेच्या अतिरिक्त फीचर्ससह शंभर, पन्नास रुपयांच्या नवीन नोटाही चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली होती. महात्मा गांधी सीरिज 2005 मधील या नोटांवर दोन्ही नंबर पॅनेलमध्ये 'एल' (L) हे अक्षर चौकटीत असेल. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल. नोटेच्या मागच्या बाजुला छपाईचं वर्ष (2017) असेल. दोन्ही पॅनलवरील नंबराचा आकार डावीकडून उजवीकडे वाढत जाईल. पहिल्या तीन अल्फा न्युमरिक कॅरेक्टर्सचा आकार मात्र कायम राहील. सध्या चलनात असलेल्या दहाच्या नोटा कायम राहणार आहेत.