Parliament Special Session : उद्यापासून (18 सप्टेंबर) नव्या संसद भवनात (New Parliament Building) विशेष अधिवेशन (Special Session) पार पडणार आहे. त्यापूर्वी आज नव्या संसदेच्या वास्तूवर फडकला तिरंगा फडकवण्यात आला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Rajya Sabha Chairman and Vice President Jagdeep Dhankhar) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थित नवीन संसदेच्या वास्तूवर तिरंगा फडकवण्यात आला. 


सकाळी साडेनऊ वाजता नवीन संसदेवर तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड उपस्थित होते. यावेळी कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, मंत्री पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद तिवारी उपस्थित होते.


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची अनुपस्थिती


या कार्य्कर्माला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे उपस्थित राहिले नाहीत. खर्गे  यांनी यापूर्वीच राज्यसभेच्या सरचिटणीसांना पत्र लिहून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले होते. मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या हैदराबादमध्ये कार्याकारिणीच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळं ते उपस्थित राहू शकले नाहीत. मल्लिकार्जुन खर्गे यांना 15 सप्टेंबरच्या संध्याकाळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे निमंत्रण आधीच मिळाले होते.


18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन


18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष सत्राच्या एक दिवस आधी हा कार्यक्रम संपन्न झाला. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान चालणारे विशेष अधिवेशन नवीन इमारतीत होणार आहे. नवीन संसदेत होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे महिन्यात करण्यात आले होते. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी आज दुपारी साडेचार वाजता सर्वपक्षीय बैठकही होणार आहे. 


नव्या संसद भवनातील दालनांचं वाटप 


मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यासंबंधीची यादी देखील जारी करण्यात आली आहे.  नव्या संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दालन हे तळमजल्यावर असणार आहे. तळमजल्यावरील दालन क्रमांक जी 33 हे अमित शाह यांना देण्यात आले आहे. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे देखील दालन तळमजल्यावरच असणार आहे. तळमजल्यावरील जी - 34 हे दालन त्यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दालन क्रमांक जी-8 देण्यात आले असून पीयूष गोयल यांना जी-30 हे दालन देण्यात आलं आहे. 


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना अपर ग्राऊंड फ्लोअरवरील दालन क्रमांक जी - 31 देण्यात आलं आहे, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दालन  क्रमांक जी- 12, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दालन क्रमांक जी - 11 देण्यात आलं आहे.  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना दालन क्रमांक जी -10 देण्यात आलं आहे. आदिवासी कार्य मंत्री अर्जुन मुंडा यांना दालन क्रमांक जी- 09, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जी - 41 आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना त्याच मजल्यावरील दालन क्रमांक जी- 17, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना पहिल्या मजल्यावरी एफ- 39 देण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Parliament Special Session: नव्या संसद भवनातील दालनांचं वाटप, नितीन गडकरींना जी-31, तर अमित शाहांना कोणते दालन?