Anantnag Encounter : काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनागमध्ये रविवारी (17 सप्टेंबर) सलग पाचव्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची कारवाई सुरूच आहे. येथील कोकरनागच्या जंगलात भारतीय लष्कराकडून दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून सेनेकडून दहशतवाद्यांना घेरले असून, त्यांना मारण्यासाठी लष्कराचे जवान सावधपणे पुढे जात आहेत.


 


ड्रोनद्वारे दिसले दोन मृतदेह 
काश्मीर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आणखी एक दहशतवादी ठार झाला आहे. तर चकमकीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे दोन मृतदेह दिसले आहेत. यातील एक मृतदेह दहशतवाद्याचा आहे, तर दुसरा मृतदेह शुक्रवारी शहीद झालेल्या जवानाचा आहे. घटनास्थळी जोरदार गोळीबार सुरू असल्याने दोन्ही मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. तर हे दहशतवादी जमिनीखाली भूयारात लपून बसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


 


दहशतवाद्यांवर बॉम्बचा वर्षाव


ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी भारतीय लष्कराकडून रॉकेट लाँचरमधून दहशतवाद्यांवर बॉम्ब हल्ला करण्यात येत आहे. यावेळी अवजड शस्त्रांनीही सतत हल्ले सुरू आहेत. दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे. या दरम्यान, संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून तेथे सर्वसामान्यांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी आहे. या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून त्यांना पळून जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने त्यांचा लवकरच खात्मा केला जाईल, असे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.


 



तीन अधिकारी शहीद


गेल्या मंगळवारपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांना घेराव घालण्यास सुरुवात केली. मंगळवारी रात्री कारवाई थांबवल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, या गोळीबारात राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि काश्मीर पोलीस डीएसपी हुमायून मुजम्मील भट्ट हे शहीद झाले. त्याच दिवशी दोन दहशतवादीही मारले गेले. यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑलआऊट ऑपरेशनची तयारी केली. गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण परिसराला वेढा घातला जात आहे, तर या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करून सर्च ऑपरेशन सुरू आहे.


 


या हल्ल्यामागे पाकिस्तानचा कट


या घटनेबाबत क्रॉस बॉर्डर कॉल इंटरसेप्टवरून या संपूर्ण हल्ल्यामागे पाकिस्तानचा कट असल्याचे समोर आले आहे. भारताच्या G20 च्या यशामुळे संतप्त झालेल्या पाक लष्कराने काश्मीरमधील लष्करी तळांवर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली होती. असं सुत्रांकडून सांगण्यात आले आहे, पाकिस्तानात कायमस्वरूपी सरकार नाही. भारतीय लष्कराने सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राईक केला म्हणून पाकिस्तानी लष्कराला भारताला चिथावायचे आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कराला त्यांच्या देशात लष्करी राजवट लागू करण्याचे निमित्त मिळेल. याआधीही लष्कराने पाकिस्तानात सरकार पाडून सत्ता काबीज केली आहे.