Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) आज जन्मदिवस, याच अनुषंगाने त्यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी पाहुयात... खरं तर, देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले मोदी हे अतिशय गरीब घराण्यातून वर आलेले आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या पंतप्रधान मोदींचा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब एका छोट्या एकमजली घरात राहायचं. सर्व आव्हानांवर मात करत मोदी मोठे झाले, त्यांच्या स्वप्नांसाठी लढणं त्यांनी कधीच थांबवलं नाही. आज ते देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.


जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा पंतप्रधान मोदींच्या यशाची बीजं बालपणातच रुजलेली दिसून येतात. पंतप्रधान मोदींच्या लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी, किस्से आहेत, ज्यावरून ते बालपणी किती कष्टाळू आणि धाडसी होते याचा परिचय होतो. मोदींच्या बालपणीच्या अशाच काही रंजक गोष्टींबद्दल आज जाणून घेऊया.


कसं होतं मोदींचं बालपण?


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमध्ये झाला. सुरुवातीच्या काळात चहाच्या टपरीवर काम करुन नरेंद्र मोदींना शिक्षण पूर्ण करावं लागलं. काम आणि अभ्यास यात समतोल राखून ते आपलं जीवन जगत होते. पंतप्रधान मोदींच्या शाळेतील मित्राच्या म्हणण्यानुसार, तो सुरुवातीपासूनच एक मेहनती मुलगा होता, त्याला विविध मुद्द्यांवर वादविवाद (Debate) करायला आवडायचं आणि पुस्तकं वाचण्याचीही आवड होती. ते वाचनालयात तासनतास घालवत असे आणि त्यांना पोहण्याचीही आवड होती.


जेव्हा मगरीला आणलं घरी


पंतप्रधान मोदींच्या 'बाल नरेंद्र' या पुस्तकात नरेंद्र मोदींच्या जीवनातील काही कथा सांगण्यात आल्या आहेत. अशीच एक कथा मगरीशी संबंधित आहे. 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या प्रसिद्ध शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत शूटिंग करत असताना त्यांनीही स्वत: याबाबत सांगितलं होतं. यावेळी मोदी म्हणाले, त्यांना घराजवळच्या तलावात मगरीचं बाळ पोहताना दिसलं आणि त्याला पकडून ते घरी घेऊन आले.


घरी आल्यावर मोदींच्या आईने त्यांना समजवलं, असं करणं पाप असल्याचं त्या म्हणाल्या. यानंतर पंतप्रधान मोदींनी मगरीचं बाळ पुन्हा तलावात सोडलं. मंदिरावर झेंडा फडकवण्यासाठी पंतप्रधान मोदी एकदा मगरींनी भरलेल्या तलावातूनही पोहून गेल्याचं बोललं जातं.


कबड्डी सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा केला पराभव


पंतप्रधान मोदींनी वडनगरमधील बीएन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. शाळेत एकदा दोन संघांमध्ये आंतर-शालेय कबड्डी सामना आयोजित करण्यात आला होता. एका संघात तरुण खेळाडू होते तर दुसऱ्या संघात वयाने थोडे मोठे खेळाडू होते. तरुण खेळाडू असलेला संघ प्रत्येक वेळी हरत असे, त्या संघातून मोदी खेळले आणि खेळाडूंनी मोदींना रणनीती बनवण्यास सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक योजना आखली, ज्यामुळे त्यांच्या संघाला तो कबड्डी सामना जिंकता आला.


पंतप्रधान मोदींना स्वच्छता प्रिय


पंतप्रधान मोदी नेहमीच स्वच्छ आणि चांगले कपडे घालताना दिसतात. ही सवय त्यांना लहानपणापासूनच लागली होती. त्यांच्या काकांनी त्यांना एकदा कॅनव्हासचे शूज भेट दिले होते, ते झूज जर मळाले तर शाळेतून आणलेल्या खडूच्या तुकड्यांनी मोदी ते शूज पांढरे करायचे. ते नेहमीच आपला पेहराव आणि गणवेश स्वच्छ ठेवायचे.  


मोदींची परिस्थिती इतकी बिकट होती की, त्यावेळी त्यांच्याकडे इस्त्री देखील नव्हती. अशा वेळी, रात्री झोपण्यापूर्वी मोदी त्यांचा गणवेश दुमडून उशीखाली ठेवायचे आणि सकाळी गरम पाण्याने भरलेला स्टीलचा ग्लास वापरून तो ड्रेस इस्त्री करायचे.


शाळेत शिकताना लिहिलं होतं नाटक


नरेंद्र मोदींनी एकदा त्यांच्या शाळेत 'पीलो फूल' नावाचं नाटक लिहिलं होतं. या नाटकात त्यांनी अभिनयही केला होता. हे नाटक एका अस्पृश्य स्त्रीच्या जीवनावर आधारित होतं, जिला मंदिराच्या आवारात येऊन पूजा करण्याची परवानगी नव्हती.


चहा विकण्याचे ते दिवस


नरेंद्र मोदी वडिलांना मेहसाणा रेल्वे स्टेशनवर चहाचं छोटसं दुकान चालवायला मदत करायचे. 'बाल नरेंद्र' पुस्तकात दिलेल्या संदर्भानुसार, 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान नरेंद्र मोदी सीमेवर जाणाऱ्या सैनिकांना जेवण आणि चहा देत असत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


PM Modi Birthday: घ्यायचा होता संन्यास, पण नशिबात होतं काही वेगळं; 'असा' होता मोदींचा CM पासून PM पदापर्यंतचा रोमांचक प्रवास