Manohar International Airport: समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील मोपा विमानातळाचं उद्घाटन केले आहे. पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलं.  मोपा एअरपोर्टला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावावरुन मनोहर असं नाव देण्यात आले आहे. यापुढे हे एअरपोर्ट मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जाणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विमानतळाच्या उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. सहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाचं उद्घाटन केलेय. 






सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आलं आहे.  त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. या विमानतळाच्या उभारणी कामात, त्रिमित मोनोलिथिक प्रीकास्ट इमारत, स्टॅबिलरॉड, रोबोमॅटिक हॉलो प्रीकास्ट भिंती, 5 जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा अशा सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विमानांच्या परिचालनाची क्षमता असणारी धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह 14 पार्किंग बेज, सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक आणि स्वायत्त हवाई दिशादर्शन सुविधा इत्यादींसह अनेक सोयींचा समावेश आहे.






सुरुवातीला, पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी 4.4 दशलक्ष प्रवाशांची सोय होईल आणि यात टप्प्याटप्प्याने वाढ होत शेवटी दर वर्षी 33 दशलक्ष प्रवाशांची सोय करण्याची क्षमता या विमानतळाला प्राप्त होईल. या विमानतळामुळे गोवा राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि येथील पर्यटन उद्योगाच्या गरजांची पूर्तता होईल. अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी थेट जोडले गेल्यामुळे हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे लॉजिस्टिक हब म्हणून सक्षमतेने काम करू शकेल. या विमानतळावर बहुविध संपर्कसुविधांची सोय करून देण्याचे देखील नियोजन सुरु आहे.






जागतिक दर्जाचे विमानतळ असून देखील हे विमानतळ प्रवाशांना गोव्याचा विशिष्ट फील आणि अनुभव देखील देईल.या विमानतळाच्या बांधणीत गोव्याचे स्थानिक वैशिष्ट्य असणाऱ्या अझुलेजोस टाईल्सचा वापर करण्यात आला आहे. येथील फूड कोर्टमध्ये गोव्याच्या चवीची जादू पुनश्च अनुभवता येईल. या विमानतळावर क्युरेटेड फ्ली मार्केटसाठी जागा राखून ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी स्थानिक कारागीर आणि हस्तकलाकार त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शित करू शकतील आणि त्यांची विक्री करू शकतील.