नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने स्पेशल प्रोटेक्शन गृप (एसपीजी) आणि सर्व राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक मंचावर एसपीजीच्या परवानगीशिवाय पंतप्रधान मोदींच्या आसपास कोणाही मंत्र्याला, खासदाराला किंवा आमदाराला जाऊ देऊ नये, असा आदेश गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांतील डीजीपी आणि एसपीजी यांना देण्यात आला आहे.

गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं की, “पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे. 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी नरेंद्र मोदी हे स्टार प्रचारक असतील, त्यामुळे प्रचारादरम्यान होणाऱ्या सभांवेळी मोदींसोबत इतर स्थानिक नेतेही मंचावर असतील. अशावेळी मोदींची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणं गरजेचं आहे.”

नक्षलवाद्यांनी नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर एसपीजीने नरेंद्र मोदी आणि एसपीजी सुरक्षा असणाऱ्या अन्य नेत्यांच्या सुरक्षेची तपासणी केली. सुरक्षेबाबतची परवानगी असल्याशिवाय रोड शो केला जाऊ नये, असं एसपीजीकडून नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सांगितलं जाणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांच्या सूचनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृहसचिव राजीव गौबा, गुप्तचर विभागाचे प्रमुख तसंच एसपीजी प्रमुख यांची एक बैठक घेतली होती. त्यानंतरच सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यावर काम सुरु झालं होतं. ज्याच्या अंबलबजावणीसाठी आता गृहमंत्रालयाने राज्यांना सूचना दिल्या आहेत.