नवी दिल्ली : "काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आतापर्यंत पप्पू म्हणून हिणवलं जायचं, पण आता ते पप्पू राहिले नाहीत. आज त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक थांबातात," असं प्रमाणपत्र कुठल्या काँग्रेच्या नेत्यानं नाही तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. राऊत नवी दिल्लीत 'एबीपी माझा'शी बोलत होते.


गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या सभा गाजत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच शिवसेनेने राहुल गांधींचं उघड समर्थन केलं आहे.

"2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, पण आता ती ओसरली आहे. गुजरातमध्ये भाजपला कडवं आव्हान मिळू शकतं. तीन वर्षांपूर्वी राहुल गांधींना पप्पू म्हटलं जात होतं, पण आता परिस्थिती तशी नाही. काँग्रेसला राहुल यांच्या रुपात एक नेता मिळाला आहे," असं संजय राऊत म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले की, "जीएसटीविरोधात गुजरातमधील जनतेच्या मनातील रोष असेच संकेत देतो की भाजपला निवडणुकीत कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल. जनता हीच देशातील सर्वात मोठी राजकीय शक्ती आहे. मतदार कोणालाही पप्पू बनवू शकतात."