नवी दिल्ली : कोरोनाचा घसरता आलेख एकीकडे दिलासा देत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रनने थोडी चिंताही वाढली आहे. ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण देशात आढळत आहेत. नव्या स्ट्रेनचे आणखी चार रुग्ण देशात आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे एकूण 29 रुग्ण आहेत. केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत भारतात दाखल झालेल्या जवळपास 33 हजार प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.





या सर्व लोकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करावी आणि संक्रमित नमुन्यांना 'जीनोम सीक्वेसिंगसाठी पाठवण्याचे गेल्या आठवड्यात निर्देश देण्यात आले आहेत. जीनोम सीक्वेन्सच्या चाचणीतच नव्या स्ट्रेनची पुष्टी होते आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आतापर्यंत असे आढळले नाही की नवीन स्ट्रेन रोगाची तीव्रता वाढवतो, मात्र त्याचं संक्रमन जास्त आहे.


देशातील कोरोनाची सद्यस्थिती


भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण सुरू आहे. सक्रिय रुग्णसंख्या आज 2.54 लाखांपर्यंत खाली आली आहे. गेल्या 179 दिवसातील हा नीचांक आहे. 6 जुलै 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्णसंख्या 2,53,287 इतकी होती. भारताची सध्याची सक्रिय रुग्णसंख्या देशाच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 2.47% आहे.


देशात दैनंदिन नवीन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात 20 हजाराच्या आसपास राहिली आहे. गेल्या 24 तासात नवीन रुग्णसंख्या 20,035 इतकी नोंदली गेली तर 23,181 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. गेल्या 35 दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे.


एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 99 लाखापर्यंत पोहचली आहे. बरे झाले रूग्ण आणि सक्रिय रुग्ण यामधील तफावत वाढत असून आता त्याने 96 लाखांचा आकडा पार केला असून ती 96,29,207 इतकी झाली आहे.


संबंधित बातम्या