नवी दिल्ली : एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नव्या नाण्यांच्या मालिकेसोबतच वीस रुपयांची नाणी बाजारात आणण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. अंध व्यक्तींनाही सहजपणे ओळखता येतील, अशा पद्धतीची या नाण्यांची रचना असेल.


सात मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नव्या नाण्यांच्या सीरीजचं अनावरण केलं होतं. आता ही नाणी बाजारात आणण्याची घोषणा सीतारमण यांनी केली.

वीस रुपयांच्या नाण्याची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. या नाण्याला बारा कडा असतील, म्हणजेच हे नाणे बहुकोनी असेल. तांबं, जस्त आणि निकलपासून या नाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

सर्व किमतीच्या नाण्यांवर अशोकस्तंभ छापण्यात आला असून त्याखाली 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य लिहिलेलं असेल. एका बाजूला देवनागरीत भारत, दुसरीकडे इंडिया हा शब्द इंग्रजीत लिहिलेला आहे.

दहा रुपयांचं नाणं चलनात आल्यानंतर जवळपास दहा वर्षांच्या कालावधीनंतर ही नवीन नाणी बाजारात आणण्यात आली आहेत. दरम्यानच्या काळात दहा रुपयांची 13 वेगवेगळ्या प्रकारची नाणी बाजारात आली. त्यामुळे काही जणांनी ही नाणी खोटी असल्याचं सांगत नाकारल्याचे दावेही केले गेले.