नवी दिल्ली : दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावर भाजपचं नवीन मुख्यालय उभारलं जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी एका भव्य कार्यक्रमात मुख्यालयाचं भूमीपूजन केले जाणार आहे.
नितीन गडकरी यांनी या मुख्यालयाचा प्रस्ताव मांडला होता. या मुख्यालयासाठी दोन वेळा आराखडा बनवण्यात आला आहे. पण पक्षाच्या कार्यकारणीला हे दोन्ही आराखडे पसंतीस उतरले नव्हते. आता नवीन बनवलेल्या आराखड्याला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे.
दीनदयाळ मार्गावरील या भाजप मुख्यालयात 70 खोल्या असतील. या मुख्यालयाला दोन विंग असतील. मुख्यालयात पक्षाध्यक्ष, नेते आणि खासदारांसाठी विशेष कक्ष असेल. 8000 चौरस मीटरवर या दोन इमारती उभारल्या जाणार आहेत. याशिवाय 2 सभागृहही असतील, ज्यांची आसन क्षमता 450 असेल. आठ कॉन्फरन्स रुम्सही या मुख्यालयात असतील, ज्यात व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधाही दिली जाईल.
या मुख्यालयात डिजीटल सिक्युरिटी सिस्टम आणि डिजीटल लायब्ररी असेल, सोबतच सर्व परिसर वायफाययुक्त असेल. मुख्यालयाचं गेट स्वयंचलित असेल जे फक्त RF टॅग असलेल्या वाहनांसाठीच उघडले जाईल.
या मुख्यालयात 200 वाहनांसाठी पार्किंगच्या सुविधेसह बायो टॉयलेट आणि कॅफेटेरियाही असतील. दोन वर्षांमध्ये या मुख्यालयाचे काम पूर्ण केले आहे. दीनदयाळ उपाध्याय मार्गावर 2005-06 मध्ये सर्व पक्षांना जागा देण्यात आली होती.