नवी दिल्ली : कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशात जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षा घेण्यावरून दोन मतं दिसत आहे. अनेक राज्यांनी नीट आणि जेईईची परीक्षा पुढे ढकण्याची मागणी केली आहे. तर केंद्र सरकार परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर ठाम आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबातत बोलताना म्हटलं की, एनटीएच्या (NTA) संचालकांनी सांगितल्याप्रमाणे जेईईच्या 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी साडेसात विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलं आहे. तर नीटच्या 15.97 लाख विद्यार्थ्यांपैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड गेल्या 24 तासात डाऊनलोड केलं आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हावी ही विद्यार्थांची इच्छा आहे, असं पोखरियाल यांनी म्हटलं.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत परीक्षा केंद्रांची संख्या आता 570 वरुन वाढवून 660 करण्यात आली आहे. तर नीट परीक्षेच्या विद्यार्थांसाठीच्या परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन 3842 करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असंही रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.
कधी होणार परीक्षा?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
संबंधित बातम्या
- JEE NEET Exam Center List: जेईई-नीट परीक्षांसाठी सेंटर्स वाढवले, राज्यनिहाय सेंटर्सची घोषणा
- कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी
- NEET JEE 2020 | मोठा निर्णय... 'नीट, जेईई परीक्षा वेळेतच', परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली