नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची 'NEET' ही प्रवेश परीक्षा 'फनी' चक्रीवादळामुळे ओदिशा राज्यात पुढे ढकलली आहे. मात्र उर्वरित सर्व राज्यांमध्ये नीट परीक्षा आज (रविवार, 05 मे ) ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.
सर्व राज्यांप्रमाणे आज ओदिशा राज्यातील 7 केंद्रावर नीट परीक्षा होणार होती. परंतु परीक्षा पुढे ठकलल्याने पुढील सुधारित वेळापत्रक लवकरच NTA कडून जाहीर केले जाणार आहे. इतर राज्यात NEET परीक्षा आज दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे.
फनी वादळाच्या तडाख्यानंतर रेल्वे, विमान आणि वाहतुकीच्या इतर सेवा खंडीत झाल्याने नीट परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप होऊ शकतो, यामुळे NSUI व इतर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता ही परीक्षा फक्त ओदिशा राज्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ही परीक्षा एकूण 18 जिल्ह्यांमधील विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी नीट परीक्षेच्या काही राज्यातील केंद्रामध्ये बदल झाल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) कडून परीक्षार्थीना कळविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी पुन्हा एकदा आपले हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे सांगण्यात आले होते.