नवी दिल्ली: राज्यसभेत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी बोलायला उभे राहिले की वातावरणातला तणाव वाढतो. आज पुन्हा एकदा हे चित्र पाहायला मिळालं. शिवाय आज तर स्वामी एका स्फोटक मुद्द्यावर बोलणार होते. महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भातले काही तपशील का लपवले? त्यांचं पोस्टमॉर्टम का नाही झालं? असे प्रश्न स्वामींनी शून्य प्रहरात विचारले.

 

खरं तर शून्य प्रहरात बोलायचं म्हणजे खासदाराकडे अवघी दोन ते तीन मिनिटेच असतात. स्वामी बोलायले उभे राहिले. "महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात काही महत्वाचे प्रश्न मला विचारायचे आहेत. कारण या मुद्द्यावरून अनेकदा बेधडक आरोप करत एका विशिष्ट संघटनेला (म्हणजे आरएसएस) लक्ष्य केलं जातं. अनेक सन्माननीय सदस्य त्यावर बोलतात आणि मग सुप्रीम कोर्ट त्यांचं कान उपटतं (राहुल गांधींकडे इशारा)." अशा फटकेबाजीनंतर स्वामींनी सांगितलं की गांधी हत्येसंदर्भातल्या अनेक फाईल्स सध्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या वाचल्यानंतर मला जी तीन तथ्य सापडली ती सभागृहासमोर मांडायची आहेत.

 

आता स्वामी तथ्य मांडणार तेही गांधीहत्येबद्दल म्हटल्यावर विरोधी बाकांवर जोरदार खळबळ सुरू झाली. काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी लागलीच हरकत घेतली. शून्य प्रहरात अशी माहिती द्यायचा अधिकार स्वामींना आहे का यावर त्यांनी आक्षेप घेतला. शिवाय स्वामींचा आधीचा इतिहास पाहता (उगीच नावं घेऊन विरोधकांना डिवचण्याचा) उपसभापती कुरियन यांनी त्यांना कुणाचंही नाव घेऊ नका असं बजावलं. त्यावर मी महात्मा गांधी यांच्याशिवाय कुठल्याही गांधीचं नाव घेणार नाही असा खोचक शेरा मारला. त्यावर सत्ताधारी बाकांवर जोरदार हशा पिकला. पण स्वामींनी त्यांचं पूर्ण म्हणणं मांडायच्या आतच प्रश्नकाळ सुरु व्हायची वेळ झाली, आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

नेहमीप्रमाणे मग स्वामींनी सदनाबाहेर येऊन मीडियाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या. ' महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचं पोस्टमॉर्टम का नाही झालं? त्यांना नेमक्या किती गोळ्या लागल्या, कारण वेगवेगळया रिपोर्टमध्ये वेगवेगळे आकडे आहेत.' असा दावा करून पुढे गांधीहत्येबद्दल संघाला जबाबदार धरणाऱ्या वक्तव्यावर राहुल गांधींना जेलमध्ये जावंच लागेल असं बेधडक विधान करुन स्वामी आपल्या छोट्या नातीसमवेत गाडीत बसून निघून गेले.