विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 22 ऑगस्टला देशव्यापी संप
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2017 10:23 AM (IST)
बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 22 ऑगस्ट म्हणजे मंगळवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामध्ये जवळपास 10 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत.
नवी दिल्ली : बँकिंग सुधारणांविरोधात देशभरातील 10 लाख बँक कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी 22 ऑगस्ट रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे मंगळवारी देशभरातील सर्व बँका बंद असणार आहेत. इंडियन बँक्स असोसिएशन, चीफ लेबर कमिशनर आणि दि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस यांच्यामध्ये शुक्रवारी बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. मात्र ती चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संपाचं हत्यार उपसलं असंल तरी सार्वजनिक बँकांचे तत्काळ खासगीकरण होणार नाही. त्यामुळे फोरमने संप मागे घ्यावा, असं आवाहन ‘आयबीएफ’ आणि दि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.