नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी अर्थात एनडी तिवारी यांची प्रकृती खालावली आहे. दिल्लीच्या मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टम म्हणजेच व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे.


एनडी तिवारी यांना ताप आणि न्यूमोनिया झाला आहे. 26 ऑक्टोबर रोजी त्यांना मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं, अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.

तिवारी यांचा रक्तदाब रविवारी अचानक कमी झाला आणि प्रकृती खालावल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं. डॉक्टरांचं एक पथक 24 तास त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. 91 वर्षीय एनडी तिवारी मागील महिन्यात चहा पिताना बेशुद्धही झाले होते.

त्याआधी सप्टेंबर महिन्यात तिवारी यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हापासून ते रुग्णालयातच आहेत.

माजी  केंद्रीय मंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल असलेल्या तिवारी यांच्यावर न्यूरोसर्जन जेडी मुखर्जी आणि हृदय रोग तज्ज्ञ सुमित सेठी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

एनडी तिवारी यांनी उत्तर प्रदेशचं तीन वेळा आणि उत्तराखंडचं एकदा मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. एनडी तिवारी हे एकमेव भारतीय नेते आहेत, ज्यांनी दोन राज्यांचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे.

इतकंच नाही तर ते आंध्र प्रदेशचे राज्यपालही होते. मात्र वादात अडकल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

रोहित शेखर नावाच्या तरुणाने आपण एनडी तिवारींचा मुलगा असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण डीएनए टेस्टपर्यंत पोहोचलं. अखेर त्यांनी रोहित आपलाचा मुलगा असल्याचं स्वीकारलं.