नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे पंजाबमध्ये अडकून पडलेल्या 300 विद्यार्थ्यांची सुटका राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे. पंजाबमधल्या जालंधरमध्ये एका व्यावसायिक प्रशिक्षण विद्यापीठात महाराष्ट्रातले 300 विद्यार्थी शिकतात. लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकून पडलेल्या या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांच्याकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सोनिया दुहन यांची टीम तातडीनं त्या ठिकाणी पोहचली.


जालंधरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांनी तिथल्या स्थाानिक प्रशासनाशी बैठका केल्या. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत त्यांना बसेसची उपलब्धता करुन दिली. विशेष म्हणजे यातल्या सर्व बसेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित केलेल्या खासगी बसेस होत्या. दोन्ही राज्य सरकारांच्या विशेष परवानगीनं या बसेसमधून आता विद्यार्थ्यांचा त्यांच्या घराच्या दिशेनं प्रवास सुरु झाला आहे.


मिशन कोटानंतर आता मिशन यूपीएससी, खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठपुरावा सुरू



महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांना घेऊन 6 बसेस जालंधरमधून रवाना झाल्या आहे. अजून काही बसेस उद्या धावतील, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. राजस्थानमधल्या कोटामध्येही विद्यार्थ्यांची सुटका करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ही टीम घटनास्थळावर प्रत्यक्ष उपस्थित होती. राजस्थानपाठोपाठ आता जालंधरमध्येही अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे.


दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत : सत्यजीत तांबे


Coronavirus | राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 361 वर