तिरुअनंतपुरम :  महापुरामुळे केरळमध्ये हाह:कार माजला असून, त्यात आतापर्यंत केरळमध्ये 324 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. राष्ट्रीय बचाव पथकांसोबत भारतीय नौदलाचे शेकडो जवान पूरग्रस्त भागात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. याच बचावकार्या दरम्यान एका गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवण्यात आले. या बचावकाचा व्हिडीओ नेव्हीने ट्विट केला आहे.

या व्हिडीओमध्ये नेव्हीने पुरात अडकलेल्या गर्भवती महिलेला दोरीच्या साहाय्याने हेलिकॉप्टरमध्ये ओढण्यात आल्याचे दिसून येते. नंतर या महिलेला जवळच असलेल्या संजीवनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. वेळीच डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत ऑपरेशन केले. यानंतर महिलेनं बाळाला जन्म दिला. सध्या बाळबाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत.



नेव्हीने केलेल्या या बचाव कार्याचे सर्व स्थरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. केरळातील भीषण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल रात्री अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल झाले.

भीषण पुरात आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू

केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलं आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

आतापर्यंत साडेआठ हजार कोटींचं नुकसान

केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत. दिल्ली, पंजाब, तेलंगणा या राज्यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर भारतीय रेल्वेकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

पाहा व्हिडीओ