तिरुवअनंतपुरम : सतत कोसळणारा पाऊस आणि महापुरामुळे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठी जीवितहानी झाली आहे. या महापुरात आतापर्यंत 324 नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास सव्वा दोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी 1924 साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती आली होती.

केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत. दिल्ली, पंजाब, तेलंगणा या राज्यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर भारतीय रेल्वेकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा, 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचं अर्थसहाय्य जाहीर केलं असून तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारने याआधीच शंभर कोटी दिले असून लागेल तेवढी मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.

केरळच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. केरळचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्र्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. मोदींकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लवकरच मोठी मदतही जाहीर होऊ शकते.

केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलं आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.