मेरठ : टीव्ही प्रसारित होणारे क्राईम शो किती धोकादायक असू शकतात आणि मुलांच्या मनावर त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो, याचं उदाहरण उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये पाहायला मिळलं. आठ वर्षांच्या एका मुलीने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘क्राईम पेट्रोल’ पाहून तिने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे.
सिमरन असं मृत मुलीचं नाव आहे. सिमरन मित्रांसोबत खेळण्यासाठी शेजारी गेली होती. सिमरन आणि तिचे सुमारे अर्धा डझनभर मित्र-मैत्रिणी क्राईमवर आधारित टीव्ही शो ‘क्राईम पेट्रोल’ पाहत होते.
यानंतर सिमरनने एका सीनची नक्कल करण्यास सुरुवात केली. एक महिला गळफास घेत असल्याचा हा सीन होता. सिमरन बादलीवर उभी राहिली आणि ओढणीचा फास बनवला तर इतर मुलांनी तिची मदत केली. पण त्याचा परिणाम इतका भीषण असेल, ह्याची कल्पनाही त्या मुलांना नव्हती.
सिमरन बादलीवर उभी होती आणि तिच्या गळ्यात गुंडाळलेली ओढणी वर लावलेल्या लोखंडी रॉडला बांधली होती, असं पोलिसांनी सांगितलं. बादली घसरल्यानंतर, फास बसला. सिमरन श्वास घेण्यासाठी तडफडत असल्याचं पाहून इतर मुलं घाबरुन तिथून पळून गेली. थोड्या वेळाने मुलं परत आली. त्यांनी सिमरनला खाली उतरवलं आणि गोणपाटात तिचा मृतदेह झाकून पुन्हा तिथून पळ काढला.
संध्याकाळ झाली तरी सिमरन घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. रात्री उशिरा त्यांना या घटनेबाबत समजल्यानतंर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.