अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झालाय. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर ट्रेन चढली, ज्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत. पोलिसांच्या मते, या अपघातात 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेने मात्र अजून कोणताही अधिकृत आकडा सांगितलेला नाही.


या कार्यक्रमासाठी पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांचीही उपस्थिती होती. पण हा अपघात होताच नवज्योत कौर घटनास्थळाहून निघून गेल्या, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. हा आरोप करत नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली जात आहे.

नवज्योत कौर यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. कार्यक्रम संपवून निघून गेल्यानंतर 15 मिनिटांनी ही घटना घडली, असा फोन आल्याचं नवज्योत कौर यांनी म्हटलं आहे. नवज्योत कौर सध्या जखमींसोबत असल्या तरी त्यांनी घटनास्थळाहून पळ काढल्याचा आरोप करत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावरही नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण, त्यांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले असले तरी ते उद्या अमृतसरला जाणार आहेत. एकीकडे केंद्रातील रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि सर्व अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांना रात्रभर झोप लागेल का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

अपघातावर कोण काय म्हणालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले असल्याचं मोदींनी म्हटलंय.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या अपघाताच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे. ते स्वतः उद्या अमृतसरला जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना मोफत उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना मदतकार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत अमित शाहांनी जखमींनी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत रेल्वेकडून सर्व प्रकारचं सहाय्य केलं जात असल्याचं सांगितलं आहे.

रेल्वेचं स्पष्टीकरण

रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी रात्रीच घटनास्थळावर पोहोचणार आहेत. ही घटना रेल्वे फाटकापासून काही अंतरावर घडली, जिथे लोक रेल्वे रुळावर उभे होते, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्मिता वत्स यांनी दिली.