ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली. चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यात येण्याची घोषणा होताच, बाजारात लोकांची गर्दी वाढली.
मुंबईसह देशभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या मिनारा मशिदीतही नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली. रमजान ईदची सुरुवात ईदच्या नमाजाने होते. सर्व मुस्लीम पुरुष नवे कपडे परिधान करुन ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील सर्व मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या संदेशात ते म्हणाले की, "ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मी देशाच्या सर्व नागरिकांना विशेषत: देश आणि परदेशात राहणाऱ्या सर्व मुस्लीम बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो. रोजानंतर पवित्र रमजान महिन्याचा उत्सहाने समारोप होत आहे. समाजात बंधुभाव आणि सामंज्यस वाढो, अशी प्रार्थना करतो."
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. "समाजातील एकता आणि एकोपा टिकून राहो, अशी प्रार्थना करतो," असं मोदींनी संदेशात म्हटलं आहे.