अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 वरुन पाकिस्तानवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदींनी म्हटलं की, काही लोक युद्ध जिंकू शकत नाही, म्हणून भारताच्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.


मी आज राष्ट्रीय एकता दिनानिमित्त लोकांना आठवण करुन देतो की, जे आपल्याशी युद्धात जिंकू शकत नाहीत, ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते विसरत आहेत की गेल्या कित्येक वर्षांपासून यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आमच्या एकतेत कुणीही फूट पाडू शकलेलं नाही. आमच्या एकतेत फूट पाडण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर आम्ही दिलेलं आहे. सरदार पटेल यांच्या आशीर्वादाने अशा शक्तींचा पराभव करण्याचा मोठा निर्णय देशाने काही आठवड्यांपूर्वीच घेतला. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावाद पसरविण्याशिवाय काहीही मिळालं नाही.


जम्मू काश्मीर देशातील एकमेव राज्य होतं, ज्याठिकाणी गेल्या तीन दशकात दहशतवादामुळे जवळपास 40 हजार नागरिकांचा बळी गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कलम 370 जम्मू काश्मीर आणि भारतीयांसाठी एक भिंत बनली होती. या भिंतीमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावाद वाढत होता. त्यामुळे आम्ही ती भिंत पाडून टाकली, असं मोदींनी म्हटलं.


काश्मीरचा मुद्दा माझ्याकडे असता तर हा प्रश्न मिटण्यासाठी उशीर लागला नसता, असं सरदार पटेल यांनी म्हटलं होतं. आज त्यांची जयंती आहे. त्यामुळे कलम 370 हटवण्याचा निर्णय आम्ही त्यांना समर्पित करतो, असं मोदींनी म्हटलं. आता जम्मू काश्मीरमध्ये राजकीय स्थिरता येईल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.