चेन्नई : राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा फैसला आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरकारच्या घोटाळ्यांवरुन मोदींनी राहुल गांधींसह त्यांच्या पक्षावर निशाना साधला आहे. मोदी म्हणाले की, देशाची सुरक्षा आणि डिफेन्स सेक्टर काँग्रेससाठी पैसे कमावण्याचे मार्ग आहेत. तमिळनाडूमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत असताना मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.


एकिकडे काँग्रेसचे नेते भारतीय सैन्यदलाच्या प्रमुखांचे नाव घेत सर्जिकल स्ट्राईकची चेष्टा करतात आणि दुसऱ्या बाजुला त्यांच्या पक्षाने देशाच्या डिफेन्स सेक्टरला लुटले असल्याचे ते सहज विसरुन जातात. मोदी म्हणाले की, काँग्रेसने देशाच्य संरक्षण विभागाला नेहमीच दुय्यम दर्जा दिला आहे. नेहमीच या क्षेत्राचा तिरस्कार केला आहे. परंतु त्यांनी या विभागाकडे नेहमीच कमाईचा स्त्रोत म्हणून पाहिले आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्यावेळी मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका केली होती.