PM Modi Inaugurate Mahakal Corridor : भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन (Ujjain) येथे स्थित महाकालेश्वर मंदिर (Mahakaleshwar Temple) आहे. पुराणातही या मंदिराचा महिमा सांगण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 11 ऑक्टोबर रोजी महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन करतील, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम 2023-24 पर्यंत पूर्ण होईल.
महाकाल कॉरिडॉरमुळे उज्जैनला नवी ओळख मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ते उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेणार आहेत आणि पूजा करणार आहेत. त्यानंतर ते उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार आहेत. महाकाल कॉरिडॉरच्या उभारणीने धर्मनगरी उज्जैनला नवी ओळख मिळणार आहे. महाभारत, वेद आणि स्कंद पुराणातील अवंतीखंडात भगवान शंकराच्या ज्या कथा वर्णन केल्या आहेत, त्या कथा आता जिवंत होणार आहेत. याचे कारण महाकालेश्वर मंदिराच्या नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात या कथा दर्शविणाऱ्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. महाकवी कालिदास यांनीही मंदिर भावनिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. एक काळ असा होता जेव्हा उज्जैन हे भारतीय वेळेच्या गणनेचे केंद्र होते आणि महाकाल ही उज्जैनची प्रमुख देवता मानली जात असे.
महाकाल प्रांगणात सुमारे 200 लहान-मोठ्या मूर्ती
आपल्या देशातील कारागीर शतकानुशतके अशी शिल्पे बनवत आहेत, जे पाहून जग थक्क झाले आहे. नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात हीच श्रेष्ठता आणि अभिमान लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. प्रांगणात लहान-मोठ्या अशा सुमारे 200 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिल्पे तयार करणाऱ्या कलाकारांनी याआधी व्यापक संशोधन केले आहे. त्यात पुरातनता आणि आधुनिकता या दोन्हींचे मिश्रण आहे.
महाकाल पथावर 108 स्तंभ
महाकाल प्रांगणात 108 खांब तयार करण्यात आले आहेत. याचे कारण म्हणजे सनातन धर्मात 108 हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यावर भगवान भोलेनाथ आणि शक्ती यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. याशिवाय कार्तिकेय आणि गणेशाची मूर्तीही कोरलेली आहे. 20.25 हेक्टरमध्ये बांधलेली सुमारे 920 मीटर लांबीच्या महाकाल प्रांगणात बसवलेली शिल्पे त्यांचीच कहाणी सांगतील. त्यासाठी पुतळ्यासमोर केलेला बारकोड स्कॅन करावा लागणार आहे. 2019 पासून पुतळे बनवण्याचे काम सुरू झाले. महाकाल पथावर 108 स्तंभ आहेत. या स्तंभांवर शंकराच्या आयुष्यावर आधारित विविध शिल्प साकारण्यात आली आहेत. मोदी जेव्हा उद्घाटनासाठी पोहचतील तेव्हा 600 साधू मंत्रोच्चार आणि शंखनाद करतील. कॉरिडोरच्या प्रवेशद्वारावर 20 फूट उंच धाग्यापासून शिवलिंग तयार करण्यात आलं आहे.