नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. उच्च न्यायालयानं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आयकर विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळं येत्या काळात सोनिया आणि राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमानपत्र पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी 1938 साली सुरु केलं होतं. हे काँग्रेसचं मुखमत्र मानलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या यंग इंडिया या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरु काही झालं नाही.

हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. 2015 साली या प्रकरणी राहुल आणि सोनिया गांधी पटियाला कोर्टात हजर झाल्या होत्या. जिथं त्यांना जामीन मिळाला. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पुन्हा गांधी परिवाराला मोठा धक्का लागल्याचं बोललं जात आहे.