Sonia Gandhi ED Summon : कोरोनासंसर्गामुळे ईडी (ED) चौकशीला हजर राहू न शकलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहे. आज सकाळी सोनिया गांधींना चौकशीला हजर राहण्याचे समन्स आहे. कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या सोनिया गांधी या चौकशीला आज हजर राहणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता त्या ईडी ऑफिसला जाण्यासाठी निघणार आहेत. प्रियंका गांधींना ईडी कार्यालयात हजर राहण्याची परवानगी द्या आणि हवेशीर आणि प्रशस्त रुममध्ये चौकशी करा, अशी विनंती सोनिया गांधींनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली आहे. 


एकिकडे सोनिया गांधींच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे ईडीनं सोनिया गांधींच्या चौकशीसाठी खास प्लान तयार केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सोनिया गांधींची चौकशी केली जाणार आहे. सोनिया गांधींची ईडीकडून तीन टप्प्यांमध्ये चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा करणार आहेत.


ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी केली जाईल. प्रश्नांच्या पहिल्या टप्प्यात, त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील ज्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये ती आयकर विभागात कर भरता का? त्यांचा पॅन क्रमांक काय आहे? देशात त्यांची कुठे-कुठे मालमत्ता आहे? परदेशात मालमत्ता कुठे आहे? त्यांची किती बँक खाती आहेत? कोणत्या बँकेत खाती आहात?


तिसऱ्या टप्प्यात सर्व गोष्टींची चौकशी 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात ईडीचं पथक असोसिएट जर्नल लिमिटेड आणि यंग इंडियन संदर्भात चौकशी करणार आहे. चौकशीचा दुसरा टप्पा बराच काळ लांबला जाण्याची शक्यता आहे. यानंतर तिसर्‍या टप्प्यात त्यांना काँग्रेसबाबत प्रश्न विचारले जातील. एजेएल असो की, यंग इंडियन असो किंवा मग काँग्रेस, सर्वांच्या सोनिया गांधी या प्रमुख व्यक्ती आहेत. तिसऱ्या टप्प्यात त्यांची सर्व पैलूंवर चौकशी केली जाईल.


8 ते 10 तास चौकशी 


सूत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तब्बल 8 ते 10 तासांपर्यंत चौकशी होण्याची शक्यता आहे. जर सोनिया गांधींची तब्येत चौकशी दरम्यान जास्त बिघडली तर त्यांना चौकशी थांबवून तात्काळ घरीही पाठवून जाऊ शकतं. सोनिया गांधींच्या चौकशीचा पुढचा टप्पा कधी होणार याबाबत ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे की, आजच्या चौकशीच्या अंतिम टप्प्यात सोनिया गांधींना पुढील चौकशीसाठी कधी बोलावायचं याचा निर्णय घेतला जाईल. 


दरम्यान, सोनिया गांधींना आलेल्या या समन्समुळे काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झालेय. या समन्सविरोधात राज्यभर आज काँग्रेसचं आंदोलन आहे. मुंबईतही आज काँग्रेस नेते ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता जीपीओ चौकातून हा मोर्चा निघाला. नाशिक आणि पुण्यातही काँग्रेसची निदर्शनं आहेत.