ED Summons Sonia Gandhi : नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीनं (ED) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी आज ईडी समोर हजर होणार आहेत. तर ईडी विरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाणार आहे. केंद्र सरकार विरोधात आज काँग्रेसचे नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या मोर्चात नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जाणार आहेत.
यापूर्वी जूनमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडी चौकशी झाली होती. त्यावेळीही ईडीविरोधात काँग्रेसनं देशभरात एल्गार पुकारला होता. यावेळी काँग्रेसनं दिल्लीत जबरदस्त निदर्शनं करत मोदी सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला होता आणि गांधी कुटुंबावरील मनी लाँड्रिंगचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. गुरुवारी, काँग्रेस खासदार संसदेच्या आत आणि बाहेर आंदोलन करतील, तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते अकबर रोडवरील मुख्यालयात जमतील आणि ईडी कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करतील.
सोनिया गांधींना ईडीचं समन्स
यापूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. पण राहुल गांधी मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. राहुल गांधींची 5 दिवसांत जवळपास 50 तासांसाठी चौकशी करण्यात आली होती. तेव्हा कांग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सलग 5 दिवस ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. आज सोनिया गांधींची ईडी चौकशी होणार असून पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक होणार आहे.
नॅशनल हेराल्ड म्हणजे काय?
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :