श्रीनगर : एकीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला पाकिस्तानला सल्ले देत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार मोहम्मद अकबर यांनी शनिवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.


विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीर विधानसभेत सुंजवानमधील सैन्य कॅम्पवरच्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा सुरु असताना, मोहम्मद यांनी ही घोषणाबाजी केली. त्यांच्या या घोषणाबाजीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

 मोहम्मद अकबर हे काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील सोनावारीचे आमदार आहेत. सुंजवानमधील सैन्य कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपच्या आमदारांकडून घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी आमदार मोहम्मद अकबर यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले.

अकबर यांच्या कृतीचा सर्वच स्तरातून टीका होत आहे. पण त्यावर अकबर यांनी हे आपलं वैयक्तीक मत असल्याचं सांगून, त्यावर कुणालाही आक्षेप असण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे.


दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद मुट्टे यांनी तात्काळ ट्वीट करुन, या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “ज्या पक्षाने द्विराष्ट्राच्या सिंद्धांताला नकार दिला, त्याची जम्मू-काश्मीरच्या विधानसभा अध्यक्षांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना आठवण करुन द्यायला पाहिजे होती. तसेच, आमदारांनीही हे लक्षात ठेवलं पाहिजे की, त्यांनी आपल्या कार्यकाळाला सुरुवात करण्यापूर्वी ‘अल्लाह’चं नाव घेऊन शपथ ग्रहण केली.”  असं मुट्टे यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी लष्कराच्या कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. सुंजवानमधील दहशतवादी हल्ल्यामुळे आपण व्यथित आहोत. या हल्ल्यात जखमी जवानांच्या कुटुंबीयांसोबत आपण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.