मुंबई: माझ्या मृतदेहावर या देशाचे तुकडे होतील असं गांधी म्हणत मग देशाची फाळणी का होऊ दिली?, भगतसिंग यांना फाशी जाहीर झाल्यावर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न गांधींनी का केले नाहीत?, रघुपति राघव राजाराम...देश बचा गए नथुराम! ही काही उदाहरणं आहेत जी #गोडसेअमररहे या हॅशटॅगवर पाहायला मिळतात. आम्ही इथे ही त्यातल्या त्यात सभ्य भाषेतली उदाहरणं दिली आहेत, मात्र गोडसे समर्थकांनी अत्यंत गलिच्छ भाषेचा वापर केलेलाही इथं पाहायला मिळतो.  विशेष म्हणजे हा हॅशटॅग म. गांधींच्या १५०व्या जयंती दिनीच चालवला जाणं, यातूनच यामागचं नियोजन दिसून येतंय.


महात्मा गांधींबद्दलची अर्धवट माहिती, व्हॉट्सअपवरून मिळवलेलं 'ज्ञान' अशा अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्या या मंडळींनी गांधीजींना यथेच्छ शिव्या घातलेल्या या हॅशटॅगवर पाहायला मिळतात. खेदाची बाब म्हणजे देशाचे दुसरे पंतप्रधान आणि गांधीजींचे सच्चे अनुयायी लालबहादुर शास्त्रींचं नाव घेऊनही काही मंडळी गांधींवर तुटून पडताना इथं दिसतात. भगतसिंग यांची फाशी टळली असती तर देश कधीचाच स्वतंत्र झाला असता, अशी मुक्ताफळं उधळणारे कट्टरतावादी मुळात भगतसिंग एका साम्यवादी विचारांचा, नास्तिक क्रांतीकारक होता हेही विसरतात. मात्र, केवळ गांधीद्वेष हा एकच अजेंडा ठेवून इथं आरोपांची अशी राळ उडालेली पाहायला मिळतेय.






दुसरीकडे, या उद्दाम लोकांना भिडणारेही काही जण या हॅशटॅगवर आढळले. अनेकांनी गांधींना मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच यांना तोंड वर करून बोलता येतंय, अशी टिपण्णी केली. काहींनी इतिहासाचे विविध दाखले देऊन या गोडसे भक्तांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. काहींनी गंमतीदार 'मीम्स' बनवून गोडसेवाद्यांची खिल्ली उडवली.


देशाच्या राष्ट्रपित्याच्या जयंतीदिनी त्यांना शिव्यांच्या लाखोल्या वाहण्याचा हा द्वेष आणि ही विकृती या मंडळींमध्ये येते कुठून हा प्रश्नच आहे. मात्र, अन्य कुणा समाजाच्या, प्रदेशाच्या नेत्यावर, श्रद्धास्थानावर टिपण्णी केल्यास परिणामांची कल्पना असल्यानं तोंड गप्प ठेवणारे गांधींवर मनसोक्त भडास काढतात, तेव्हा गांधी हे टीका करण्यासाठी सर्वात खुले आणि सहिष्णू व्यक्तिमत्व असल्याची पावतीच आपल्याला मिळते.