न्यूयॉर्क : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानी दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करु शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. पाकिस्तानने या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवलं तर भारतावरील हल्ले रोखले जाऊ शकतात. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर अनेकांना भीती आहे की दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करु शकतात, असं अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाचे इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे असिस्टंट सेक्रेटरी रँडल शिल्वर यांनी म्हटलं.
रँडल शिल्वर यांनी पुढे म्हटलं की, मला नाही वाटत की चीन अशा प्रकारचा कोणत्याही संघर्षाचं समर्थन करेल. काश्मीर मुद्द्यावरुन चीनने पाकिस्तानला दिलेले समर्थन राजकीय आणि कुटनीतीचा भाग आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरुन चीनने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनाच्या प्रश्नावर शिल्वर बोलत होते.
चीनने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर समर्थन दिलं आहे. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जायचा की नाही, यासंबंधी काही चर्चा झाली तर चीनचं पाकिस्तानला समर्थन असेल. मात्र यापेक्षा जास्त चीन काही करेल असं वाटत नाही, अशी शक्यता शिल्वर यांनी व्यक्त केली.
चीन आणि पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत. दोन्ही देशांची भारतासोबतची स्पर्धा वाढली आहे. मात्र चीन भारतासोबत स्थिर संबंधांसाठी प्रयत्नशील आहे. भारत-चीन संबंधांविषयी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याची चर्चा सुरु आहे.