अलीगड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह, अभिनेता आमीर खान आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांना गद्दार म्हटले आहे. त्या तिघांची तुलणा बंगलचा नजाफी नवाब मीर जाफर आणि धोकेबाज म्हणून ओळख असलेला राजपूत राजा जयचंद यांच्याशी केली आहे. इंद्रेश कुमार यांनी सोमवारी अलीगड येथे माध्यमांशी बोलताना या तिघांना गद्दार संबोधले आहे.


इंद्रेश कुमार म्हणाले की, "नसिरूद्दीन शाह, आमीर खान हे दोघे चांगले अभिनेते असतील. परंतु ते सन्मानास पात्र नाहीत. कारण ते गद्दार आहेत. ते मीर जाफर आणि जयचंद यांच्यासारखे गद्दार आहेत."

कुमार एवढ्यावरच थांबले नाहीत ते म्हणाले की, "भारताला अजमल कसाबसारख्या युवकांची नव्हे तर दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. कलाम यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्यांची गरज आहे."

'यांच्या'मुळे राम मंदिर प्रश्न रखडला 
इंद्रेश कुमार म्हणाले की, "काँग्रेस, डावे पक्ष, धार्मिक शक्ती आणि काही न्यायाधीशांमुळे अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उशीर होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसमुळेच राम मंदिरास विलंब होत आहे."