नवी दिल्ली : ज्येष्ठ कामगार नेते आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपासून जॉर्ज फर्नांडिस आजारी होते. फर्नांडिस अल्झायमर आजाराने ग्रस्त होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी आतापर्यंत संघवादी, राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणून अनेक भूमिका बजावल्या.


आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांनी 1977 मधील लोकसभा निवडणूक जेलमधूनच मुजफ्फरपूर मतदारसंघाकडून लढवली आणि ते विक्रमी मतांनी विजयी झाले. जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानंतर जनता पार्टीचं विभागली. फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली आणि भाजपने त्यांना पाठिंबा दिला. फर्नांडिस यांनी आपल्या राजकीय प्रवासात एकूण तीन मंत्रालयांचा कारभार पाहिला, उद्योग, रेल्वे आणि संरक्षण मंत्रालय.

अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण मंत्री असताना त्यांनी सैन्यासाठी अनेक चांगली पावलं उचलली होती.

3 जून 1930 रोजी कर्नाटकमध्ये जन्मलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचं दहा भाषांवर प्रभुत्त्व होतं. हिंदी, इंग्लिश, तामिळ, मराठी, कन्नड, उर्दू, मल्याळी, तुलू, कोंकणी आणि लॅटिन भाषा ते उत्तम बोलायचे. त्यांची आई किंग जॉर्जची (पाचवा) चाहती होते. त्याच्याच नावावर त्यांनी आपल्या सहा मुलांपैकी सर्वात मोठ्या मुलाचं नाव जॉर्ज ठेवलं होतं.

आणीबाणीदरम्यान अटकेपासून वाचण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांनी पगडी परिधान केली आणि दाढी ठेवून शिखांचा वेश धारण केला होता. पण अटकेनंतर तिहार जेलमध्ये ते इतर कैद्यांना गीताचे श्लोक सांगत असत. 1974 च्या रेल्वे संपानंतर ते मोठे नेते म्हणून समोर आले. त्यांनी बिनधास्तपणे आणीबाणीचा विरोध केला.

जॉर्ज फर्नांडिस यांचा अल्पपरिचय
- जन्म : 3 जून 1930
- मृत्यू : 29 जानेवारी 2019
- 1998-2004 या काळात देशाचे संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत
- अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळातला महत्त्वाचा चेहरा
- 1999 च्या कारगिल युद्धावेळी संरक्षणमंत्री
- 1967 ते 2004 पर्यंत फर्नांडिस 9 वेळा लोकसभा खासदार
- 1974 सालच्या रेल्वे आंदोलनात मोलाची भूमिका
- देशाच्या रेल्वे, दूरसंचार, उद्योग खात्यांच्या मंत्रीपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली
- 1994 साली जनता दल (सेक्युलर) सोडून समता पार्टीची स्थापना
- 1999 साली पुन्हा जनता दल (सेक्युलर)चं विभाजन झाल्यावर अनेक नेते समता पार्टीत
- त्यानंतर समता पार्टीचं नामकरण जनता दल (युनायटेड) ठेवण्यात आलं
- ऑगस्ट 2009 ते जुलै 2010 या काळात राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त
- 1950-60 च्या दशकात कामगार नेते म्हणून त्यांची कारकीर्द गाजली
- ‘बंदसम्राट’ अशीही त्यांची ओळख

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पीएम नरेंद्र मोदी यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "जॉर्ज साहेबांनी भारताच्या उत्तम नेतृत्त्वाचं प्रतिनिधित्त्व केलं. ते बिनधास्त आणि निर्भीड होते. त्यांनी देशासाठी अनमोल योगदान दिलं. ते गरिबांचा सर्वात मजबूत आवाज होते. त्यांच्या निधनाने मला अतिशय दु:ख झालं आहे," असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.


फर्नांडिस यांच्या निधनावर शोक

- जॉर्ज फर्नांडिस यांच्या जाण्याने आपण एक मोठा नेता गमावला आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

- आज आपण एक जहाल माणूस, उत्तम प्रशासक, महाराष्ट्राचा कणखर नेता, कामगारांचा नेता गमावला आहे : खासदार सुप्रिया सुळे

- कामगार चळवळीला शक्तीशाली बनवणारा नेता गमावला, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जॉर्ज फर्नांडिस म्हणजे संजिवनी होते : समाजवादी नेते रमेश जोशी

- अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्या पिढीतलं नेतृत्व महाराष्ट्राने गमावलं : शिवसेना खासदार संजय राऊत