नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या होणार आहे. या मंत्रिमंडळात दहा राज्यातून 19 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून यात पाच एसटी, दोन अल्पसंख्यांक आणि दोन महिलांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

 

दरम्यान, मोदी-शाह यांनी शिवसेनेला ठेंगा दाखवला असला तरी रामदास आठवले यांचं मंत्रिपदाचं स्वप्न मात्र पूर्ण झालं आहे. आज आठवले यांनी सकाळी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

 

आठवले महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळं दलितांची सहानुभुती मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

 

दुसरीकडे जळगावातील पॉवरफुल नेते एकनाथ खडसे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपनं केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मराठा समाजाचे डॉ. भामरे यांची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी आहे. उत्तर महाराष्ट्रातील बिघडलेलं समीकरण दुरुस्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.

 

मात्र, महाराष्ट्रातील दोन नव्या केंद्रीय मंत्र्यांना नेमकी कुठली खाती मिळतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.