नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटसाठी आता क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरही तुम्हाला अवलंबून रहावं लागणार नाही. तुमचा अंगठाच तुमच्या पेमेंटचा 'आधार' होणार आहे. 14 एप्रिलपासून मोदी सरकार 'आधार पे' योजना सुरु करणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थात 14 एप्रिलचा मुहूर्त साधून नागपुरात या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 'आधार पे'च्या माध्यमातून केवळ अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने तुम्ही पेमेंट करु शकाल.

यासाठी तुमचं बँक खातं आधार संलग्न असणं आवश्यक आहे. सोबतच तुमचा आधार क्रमांकही तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. 'आधार पे' फिंगरप्रिंट सेंसरशी जोडलेलं असेल. विशेष म्हणजे प्लॅस्टिक मनी किंवा मोबाईल अॅपची आवश्यकता नसेल.

भीम अॅप पेक्षा काहीशी वेगळी असलेली ही योजना मुख्यत्वे दुकानदारांसाठी असेल. ग्राहकांकडे स्मार्टफोन नसला तरी बायोमॅट्रिक स्कॅनच्या मदतीने पेमेंट करणं शक्य होणार आहे. पुढच्या सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधीत 70 टक्के दुकानांमध्ये आधार पे सुरु करण्याचं लक्ष आहे.