मुंबई : मी काल अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही, असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं.

अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकाच कारमध्ये प्रवास केल्याची दृश्य समोर आल्यानंतर नारायण राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी ही दृश्यं खोटी ठरवत कोणाशीही भेट झाली नसल्याचा दावा केला.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • राहुल गांधींनी सर्व ऐकून घेतलं, मात्र माझ्या तक्रारीचं निवारण नाही : नारायण राणे

  • मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात दोनदाच भेटलो : नारायण राणे

  • भाजपकडून ऑफर येते, आता मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना : नारायण राणे

  • परवा जयकुमार रावल घरी आले होते, त्यांच्याशी हॉलमध्ये बसून पक्षबदलाची चर्चा करु का? : नारायण राणे

  • कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही : नारायण राणे

  • मी अमित शाह यांच्या घरी सोबत असतानाचा फोटो दाखवा : नारायण राणे

  • मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडीओ आहे का? : नारायण राणे

  • रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही : नारायण राणे

  • भाजपची ऑफर जुनीच, पण नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही : नारायण राणे

  • देवेंद्र फडणवीस आणि शाहांना भेटलो असतो, तर लपून राहिलं असतं का?: नारायण राणे

  • जर पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो, थेट निर्णय घेतला असता : नारायण राणे

  • वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला गेलो होतो, सकाळी पावणे सात वाजता मुंबईत : नारायण राणे

  • काल मी अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही : नारायण राणे

  • अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती : नारायण राणे


LIVE UPDATE : भाजपच्या सूत्रात बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वागत असेल - रावसाहेब दानवे

LIVE UPDATE : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाविषयी कल्पना नाही - रावसाहेब दानवे

LIVE UPDATE : नारायण राणे दुपारनंतर कोकणात जाणार

LIVE UPDATE : थोड्याच वेळात राणे माध्यमांशी बोलण्याचीही शक्यता

खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते नारायण राणेंप्रकरणी नवा गौप्यस्फोट झाला आहे. दस्तुरखुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसतंय.

‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात.

त्यामुळे खासगी कामासाठी राणेंना राज्याचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात असा सवाल आता उपस्थित होत आहे.

काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. मात्र काल राणेही अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.

मात्र राणेंनी मुंबईत पोहोचताच पहिली प्रतिक्रिया दिली. खाजगी कामासाठी मी अहमदाबादला जाऊ शकत नाही का? असा प्रतिसवाल राणे यांनी विचारला.

पण आता राणे आणि मुख्यमंत्री काल रात्री अहमदाबादमध्ये एकाच कारमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे नारायण राणे म्हणतात त्याप्रमाणे त्यांचं खरंच खासगी काम होतं की राणे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहेत, यावरुन अंदाज बांधले जात आहेत.

दौरा खासगी – राणे

दरम्यान अहमदाबाद विमानतळावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राणे यांनी मुंबईत पोहोचताच, आपला अहमदाबाद दौरा हा खाजगी कामासाठी असल्याचं सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी माझानं दिली होती. पण त्यावेळी राणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली होती.. पण त्याचवेळी राज्यातल्या पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली होती… त्यामुळे राणेंचा अहमदाबाद दौरा हा कमालीचा लक्षवेधी ठरला आहे.

मुख्यमंत्री – अमित शहांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे अहमदाबादेत असतानाच नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.