नवी दिल्ली : द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत पार पडलेल्या ‘एक नई सुबह’ या रंगारंग सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विकासकामांचा पाढा वाचला. दिल्लीच्या इंडिया गेटवर हा कार्यक्रम पार पडला.


 

एका बाजूला विकासवाद तर दुसऱ्या बाजूला विरोधवाद आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतला तसेच 37 हजार कोटींचा भ्रष्टाचार थांबल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. आधी काय होतं आणि आता काय होत आहे याची तुलना होणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच जनताच दूध का दूध आणि पानी का पानी करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

या सोहळ्याला अमिताभ बच्चन, अनिल कपूर, जुई चावला, रविना टंडन, विद्या बालन यांसह अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली. अमिताभ यांनी कार्यक्रमादरम्यान बेटी बढाओ, बेटी पढावो या सरकारी योजनेचा प्रचार केला.

 

मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं दिल्लीत भाजपनं आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. इंडिया गेटवर नई सुबह या नावाच्या कार्यक्रमातंर्गत केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा कारभार जनतेपुढं सादर केला.

 

याआधीही एक वर्षाच्या पूर्तीनिमित्त भाजपनं असाच कार्यक्रम केला होता..मात्र या कार्यक्रमाचं आयोजन भव्यदिव्य असून त्यासाठी मोठा पैसाही खर्च केला गेला आहे. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारकडून अशा कार्यक्रमाचं आयोजन सुरु असल्याचा आरोपही होतो आहे.