65 वर्षांचे प्रताप सारंगी हे ओदिशाच्या बालासोरमधून भाजपच्या तिकीटावर खासदार झाले आहेत. यापूर्वी 2004 आणि 2009 मध्ये ते निलगिरीतून आमदार झाले होते. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यंदा बिजू जनता दलाचे कोट्यधीश उमेदवार रवींद्रकुमार जेना यांचा पराभव करत सारंगी ओदिशातील बालासोरमधून निवडून आले. दांडग्या जनसंपर्काच्या बळावर सारंगींनी विजयाला गवसणी घातली.
सारंगींनी स्वतःला समाजकार्यामध्ये झोकून दिलं आहे. सारंगी आजही शेती करतात आणि सायकलवरुन प्रवास करतात. सारंगी यांनी घरादाराचा त्याग करण्याचा निश्चय केला होता, मात्र आईची हाक ऐकून त्यांनी निर्णय बदलला. अविवाहित असलेल्या सारंगींनी बालासोर आणि मयुरभंज या आदिवासी भागात अनेक शाळा सुरु केल्या आहेत.
सारंगींच्या 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' या तत्त्वाची मोदींना भुरळ पडली. 2017 मध्ये ओदिशा दौऱ्यावर असताना मोदींनी केंद्रीय मंत्र्यांपेक्षा सारंगींची आत्मीयतेने चौकशी केली होती. आता सारंगी यांना कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.