अमित शाह कॅबिनेटमध्ये, भाजपाध्यक्षपदाची धुरा 'या' नेत्याकडे?
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2019 09:08 AM (IST)
मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणाऱ्या जे पी नड्डा यांच्याकडे यंदा कोणतंही मंत्रालय सोपवण्यात आलेलं नाही. त्यामुळे जे पी नड्डा यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
फोटो : गेट्टी इमेज
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 58 खासदारांनी गुरुवारी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मोदींच्या कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच भाजपाध्यक्ष अमित शाह यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे शाह यांचं खातेवाटप झाल्यानंतर भाजपाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रालय सांभाळणाऱ्या जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह दुहेरी जबाबदारी पेलण्याऐवजी अध्यक्षपदाची खुर्ची एखाद्या विश्वासू नेत्यावर सोपवण्याची चिन्हं आहेत. मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणाऱ्या जे पी नड्डा यांच्याकडे यंदा कोणतंही मंत्रालय सोपवण्यात आलेलं नाही. त्यामुळे जे पी नड्डा यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. जे पी नड्डा हे हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर खासदार आहेत. ते भाजपच्या संसदीय बोर्डाचाही भाग होते. जे पी नड्डा यांच्यासोबतच आणखी दोन नावंही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. ओम प्रकाश माथुर आणि भूपेंद्र यादव यांच्या नावाचीही भाजप अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. त्यामुळे नेमकं कोणावर मोदी-शाहांची मर्जी होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. अमित शाह 2014 पासून भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी यंदा गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. तब्बल 5.57 लाखांच्या मोठ्या मताधिक्याने अमित शाह यांनी काँग्रेस उमेदवार सी जे चावडा यांचा पराभव केला. 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड विधानसभा निवडणुका, पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळवून देण्यात शाह यांचा महत्वाचा वाटा आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या जागी कोणाची निवड होणार याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांची नावं आघाडीवर आहेत. तर उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे आणि बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांचीही केंद्रात निवड झाल्याने त्यांची जागा कोण घेणार, याची उत्सुकता आहे.