नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना संबोधित केले. लाल किल्ल्यावरून केलेल्या या भाषणात मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. देशाच्या राजकारणातील घराणेशाही निष्ट होणे गरजेचे आहे. देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू होणे गरजेचे आहे, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. तसेच आपल्या भाषणात त्यांनी देशात 'सेक्यूलर सिव्हील कोड' (धर्मनिरपेक्ष नागरी संहिता) लागू करण्याची गरज आहे, असे मतही व्यक्त केले.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयाने याआधी अनेकवेळा समान नागरी कायद्यावर चर्चा केलेली आहे. अनेकवेळा याबाबत आदेश दिला आहे. ज्या नागरी कायद्याला घेऊन आपण जगत आहोत, तो एका प्रकारे सांप्रदायिक कायदा आहे. हा भेदभाव करणारा कायदा आहे. आज आपण संविधानाचे 75 वर्षे साजरे करत आहोत. संविधान निर्मात्यांचे स्वप्न पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे. या गंभीर विषयावर चर्चा व्हायला हवी, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.
कम्यूनल सिव्हील कोडमध्ये 75 वर्षे घालवली
तसेच, प्रत्येकाने आपापले विचार मांडावेत. जे कायदे धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करतात, जे कायदे उच्च-नीचतेचं कारण बनतात, अशा कायद्यांना आधुनिक समाजात कोणतेही स्थान नाही. म्हणूनच एक सेक्यूलर सिव्हील कोड असायला हवा, अशी देशाची मागणी आहे. आपण कम्यूनल सिव्हील कोडमध्ये 75 वर्षे घालवली आहेत. आता आपल्याला सेक्यूलर सिव्हील कोड स्वीकारणे गरजेचे आहे. देशात धर्माच्या आधारावर जो भेदभाव केला जातोय, सामान्य नागरिकांना जो दुरावा जाणवतो, त्यापासून आपल्याला यामुळे मुक्ती मिळेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
एक देश, एक निवडणूक धोरणावर मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना एक देश एक निवडणूक धोरणाचाही पुनरुच्चार केला. देशात आता एक देश एक निवडणूक धोरण राबवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. तसेच राजकारणातील घराणेशाही नष्ट करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. देशभरातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेलेल्या एक लाख तरुण-तरुणींना पुढे यावे आणि राजकारणात सक्रीय व्हावे. त्यांनी कोणत्याही पक्षात जावे पण राजकारणात यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
हेही वाचा :
Narendra Modi Speech Highlights : देशात एक देश एक निवडणूक धोरण राबवणे गरजेचे : नरेंद्र मोदी
Narendra Modi Speech : घराणेशाही ते वन नेशन वन इलेक्शन, मोदींच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे!