नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकीतील पराभवावर चिंतन होणार आहे. तसंच निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देऊ शकतात. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पी.चिदंबरम, सिद्धरामय्या, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन अमरिंदर सिंह, आरपीएन सिंह, मोतीलाल वोरा, केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत.
पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी राजीनामा दिला. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी राहुल गांधीकडे आपला राजीनामा पाठवला. तर ओदिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
अशोक चव्हाणही राजीनामा देणार
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही पदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा जिंकली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत चव्हाणांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामी त्यांचा पराभव झाला. यामुळे चव्हाण राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचा केवळ 52 जागांवर विजय
काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ 52 जागाच मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 44 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. या निवडणुकीत एकट्या भाजपला 303 जागांवर विजय मिळाला. तर एनडीएला 352 जागांवर यश मिळाला.
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, अशोक चव्हाणही राजीनाम्याच्या तयारीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 May 2019 11:47 AM (IST)
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन करण्यात येईल. सोबतच राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -