नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर आज (25 मे) भाजपसह सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड केली आहे. केंद्रीय सभागृहतील बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर भाजपचे दोन माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी या प्रस्तावावर मोहर उमटवली.


गडकरी आणि सिंह यांच्या समर्थनानंतर शिरोमणी अकाली दलचे नेते प्रकाश सिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनीदेखील अमित शाह यांच्या प्रस्तावास समर्थन दिले.

NDA Meet | एनडीएच्या संसदीय पक्षनेतेपदी नरेंद्र मोदींची निवड | नवी दिल्ली | ABP Majha



शिरोमणी आणि जेडीयूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान आणि अण्णाद्रमुकसह एनडीएमधील अन्य पक्षांच्या नेत्यांनी अमित शाह यांच्या प्रस्तावास समर्थन दिले.

नरेंद्र मोदी केंद्रीय सभागृहात पोहोचण्यापूर्वी एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार, भाजपसह घटक पक्षांचे वरिष्ठ नेते सभागृहात दाखल झाले होते. मोदी सभागृहात दाखल झाल्यानंतर अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी उपस्थित खासदारांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

NDA Meet | संसदेत पाय ठेवल्यावर दिलेला संकल्प मोदींनी पूर्ण केला : अमित शाहा | नवी दिल्ली | ABP Majha