म्हैसूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक मानल्या जाणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल वाजलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण भारतात आपलं खातं उघडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कर्नाटकातील म्हैसूरमध्ये मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. "कर्नाटकमध्ये कसे सरकार हवे, मिशन की कमिशन?", असा प्रश्न मोदींनी कर्नाटकवासियांना विचारला.


जैन धर्माचे भगवान बाहुबली यांच्या महामस्तकाभिषेकाचा पवित्र उत्सव कर्नाटकातील बंगळुरुपासून 150 किमी अंतरावरील श्रवणबेलगोलामध्ये सुरु आहे. 12 वर्षांनी एकदा हा महामस्तकाभिषेक उत्सव होतो. यावेळच्या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी भगवान बाहुबलींचे दर्शन घेतल्यानंतर जैन मठाने बांधलेल्या एका रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर, म्हैसूर आणि उदयपूर दरम्यान सुरु होणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडाही दाखवला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हेही उपस्थित होते. दोघे एकत्र असले, तरी एकमेकांशी फार बोलले नाहीत. याचवेळी म्हैसूरमध्ये झालेल्या एका सभेत मोदींनी सिद्धरमैया यांच्यावर टीका केली.

कर्नाटकमध्ये मे-जून या महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दक्षिण भारतात सत्तेचे दरवाजे उघडण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत. त्यामुळे कर्नाटक निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.