नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सकाळी साडेनऊ वाजता मोदी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारताच्या मदतीने बांधलेल्या 1457 कोटींच्या सलमा धरणाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे.


 
हेरातमध्ये पोहचल्यानंतर मोदी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्यासोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदी कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचाही दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरुन परतताना ते जर्मनीलाही जाण्याची शक्यता आहे.

 
एकूण सहा दिवसांच्या या दौऱ्यात प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदी चर्चा करणार आहेत. दरम्यान मोदींच्या या दौऱ्यामुळे काळा पैसा भारतात आणण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

 

चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.