आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी : नरेंद्र मोदी
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2018 01:58 PM (IST)
'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी अनुभवण्यास सांगितलं.
नवी दिल्ली : आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी वारी अनुभवण्यास सांगितलं. 'मन की बात'मध्ये अतिवृष्टीसह देशातील विविध समस्यांवर भाष्य करताना मोदींनी पंढरपूरच्या वारीचं महत्त्व अधोरेखित केलं. संतोष काकडे नावाच्या व्यक्तीने मोदींना पंढरपूरविषयी प्रश्न विचारला. 'विठूरायाचं दर्शन घेणं हा एक वेगळा अनुभव आहे. महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढ महिन्यात वारी निघते. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम आहे. पंढरपूरच्या विठोबा मंदिरात जाण्यासारखा दुसरा आध्यात्मिक आनंद नाही. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा अनुभव घ्यावा' असं आवाहन मोदींनी केलं. याच कार्यक्रमात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं आहे.