नवी दिल्ली: अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करणाऱ्या युवा आमदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलेच झापले आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आमदार आकाश विजयवर्गीय याने गुंडगिरी करत अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद भाजपच्या संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीत उमटले.


आकाश विजयवर्गीय यांची ही वर्तणूक चांगली नाही. अशा गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे मोदींनी म्हटले आहे. आपल्या मनात वाटेल तसे वागले जात आहे. अशा गोष्टींचे समर्थन होऊच शकत नाही. खासदारांचा मुलगा असो अथवा मंत्र्यांचा मुलगा असो अशी वागणूक चांगली नाही, अशा भाषेत नरेंद्र मोदींनी आकाश विजयवर्गीय यांना झापले आहे. विशेष म्हणजे यावेळी आकाशचे वडील कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते.

यावेळी मोदी म्हणाले की, एक आमदार कमी झाल्याने काय फरक पडेल? हा घमंड, अशी वागणूक चांगली नाही. अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.


काय आहे घटना?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्याला चक्क क्रिकेटच्या बॅटनं मारहाण केली होती. आकाश यांचा हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला होता. इंदूरमध्ये पालिकेचे अधिकारी एका जर्जर घराचं तोडकाम करण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय तिथं पोहोचले आणि त्यांच्यात वाद झाला. परंतु हा वाद एवढा विकोपाला गेला की, क्रिकेटची बॅट थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांवर उचलून मारहाण केली आहे.



एवढेच नव्हे तर आकाश यांच्या समर्थकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मारहाण केली होती. 26 जूनच्या या घटनेनंतर पोलिसांनी आकाश विजयवर्गीयला अटकी केले होते. त्यानंतर त्याला जामीन मिळाला.  30 जूनला जेलमधून बाहेर आल्यावर आकाश विजयवर्गीयचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मिठाई वाटत हवेत फायरिंग देखील केली गेली.