काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या हौज काजी परिसरात एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर मंदिराची तोडफोड करण्यात आली. जुन्या दिल्लीच्या लाल कुआं बाजारात असलेल्या 'गली दुर्गा मंदिर' रविवारी रात्री उशिरा दगडफेक झाली. हिंदू वस्तीच्या सुरुवातीलाच असलेलं हे मंदिर शंभर वर्ष जुनं आहे. या वस्तीच्या बाहेर दुतर्फा मुस्लीमबहुल परिसर आहे.
यानंतर ट्विटरवर टेंपल टेरर अटॅक हा ट्रेण्ड होण्यास सुरुवात झाली. उत्तर भारतातील बरेच ट्विटर युझर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करुन ते आज असते तर अशी घटना घडलीच नसती, अशा आशयाचे ट्वीट करत आहेत.
बाळासाहेब केवळ स्वत:च्या राज्यात नाही तर संपूर्ण भारतातच हिंदूंच्या बाजूने आवाज उठवत होते. आज त्यांची फारच आठवण येत आहे, असं एकाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आज या माणसाची प्रचंड आठवण येत आहे, असं ट्वीट मोहित कुंदरिया नावाच्या एका ट्विपलने केलं आहे.
भारताचा एकमेव वाघ, आम्हाला तुमची आठवण येत आहे सर, असं ट्वीट पुप्षेंद्र शेखावत या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.
कोणत्याही परिस्थितीत आमच्या बाजूने उभा राहणारा परफेक्ट माणूस, असं ट्वीट अभयराज जयस्वाल या ट्विटर युझरने केलं आहे.
पार्किंगवरुन वादाचं मंदिरावरील दगडफेकीत रुपांतर
"दुचाकीच्या पार्किंगवरुन वाद सुरु झाला. त्याचं पर्यवसान धार्मिक तणावात झालं. रात्री 12 नंतर गल्लीच्या बाहेर गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. गर्दीने आधी घोषणाबाजी केली आणि काही वेळाने दगडफेकीला सुरुवात केली.
तर नशेत असलेल्या काही मुलांनी रविवारी रात्री अकराच्या सुमारास एका तरुणाला मारहाण केली होती. दुचाकीवरुन त्यांच्यात वाद झाला होता. पण तो तरुण जखमी अवस्थेत आपल्या वस्तीत पोहोचला असता, लोकांचा पारा चढला, असा दावा मुस्लीम वस्तीतील स्थानिकांनी केला.
मुस्लीम तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली तर काही आरोपी फरार आहेत. ज्यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं, त्यानंतर गली दुर्गा मंदिरावर दगडफेक करण्यात आली, असं हौज काजी पोलिस स्टेशनचे एसएचओ सुनील कुमार यांनी सांगितलं.
20 ते 25 जणांच्या जमावाने गली दुर्गा मंदिरात दगडफेक केली. वस्तीत पोहोचताच जमावाने मंदिरात तसंच काही घरांवर दगडफेक केली आणि काही मिनिटांतच तिथून निघून गेले, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. या गल्लीत राहणारे बहुतांश लोक हिंदू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना पकडलं आहे. तीनपैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेतलं आहे. तर दोघांना अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिन्ही आरोपी धार्मिक स्थळाची तोडफोड करता दिसत आहेत, असा स्थानिकांचा दावा आहे.