नवी दिल्ली: काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आज भाजपत प्रवेश करतील, अशा चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. आज दिल्लीत जाऊन राणे भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्लीत आयोजित भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नारायण राणे हे अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं समजतंय.
नारायण राणे हे सिंधुदुर्गातील रुग्णालयाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्याच्या निमित्ताने अमित शाहांना भेटणार आहेत.
भाजपची विचारधारा स्वीकारणाऱ्यांचं स्वागत
दरम्यान, भाजपची विचारधारा स्वीकारणाऱ्यांचं स्वागत असेल, असं मत भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांच्यासोबत राणेंची बैठक झाल्यानंतर अधिक माहिती देऊ, असंही सरोज पांडे म्हणाल्या.
नारायण राणे यांनी नुकताच काँग्रेसला रामराम केला आहे. त्यामुळे ते एकतर नवीन पक्षाची स्थापना करतील किंवा भाजपात जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि नारायण राणे यांच्या भेटीने आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
दरम्यान, राणेंच्या भाजप प्रवेशाला भाजपमधूनच काहींनी विरोध केला आहे. त्यावर आज काय निर्णय होतो, अमित शाह आणि राणेंची बैठक झाली, तर दोघांच्या बैठकीतून काय बाहेर येतं, हे पाहणं महत्वाचं असेल.
राणेंचा काँग्रेसला रामराम
“तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.