उरी सेक्टरमध्ये लष्करी तळावरील हल्ल्याचा कट उधळला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2017 12:01 AM (IST)
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरच्या जंगलात लपून बसलेल्या 3 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातलं.
श्रीनगर : भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्यासाठी आलेल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरच्या जंगलात लपून बसलेल्या 3 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातलं. या चकमकी दरम्यान एक जवान तर 4 भारतीय नागरिक जखमी झाले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहशतवादी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्यासाठी आले असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्यानंतर उरीच्या जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराच्या जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. सीमा भागातल्या जंगलात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या एका कारवाई दरम्यान भारतीय जवानांनी कुपवाडामधून दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.