डिंपल अखिलेश यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2017 08:20 AM (IST)
'आमच्याकडे कोणतीही घराणेशाही नाही. मात्र तुम्हाला जर असं वाटत असेल, तर यापुढे माझी पत्नी डिंपल यादव कधीच निवडणूक लढवणार नाही.' अशी घोषणा अखिलेश यांनी केली.
लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यापुढे कधीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत. घराणेशाहीला चाप लावण्यासाठी खुद्द अखिलेश यांनी ही घोषणा केली. डिंपल यादव उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून लोकसभेच्या खासदार आहेत. सलग दुसऱ्यांदा त्या या मतदारक्षेत्रातून निवडून आल्या आहेत. पहिल्यांदा त्यांनी फिरोजाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज बब्बर यांच्याकडून डिंपल यांचा पराभव झाला होता. 'आमच्याकडे कोणतीही घराणेशाही नाही. मात्र तुम्हाला जर असं वाटत असेल, तर यापुढे माझी पत्नी डिंपल यादव कधीच निवडणूक लढवणार नाही.' अशी घोषणा रायपूरमधील कार्यक्रमावरुन परतल्यावर पत्रकारांशी बोलताना अखिलेश यांनी केली. राहुल गांधी यांनी भारतातील घराणेशाहीवर केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला. अखिलेश यादव यांच्या कुटुंबातील पाच जण लोकसभेवर खासदार आहेत, तर काका रामगोपाल यादव राज्यसभेवर खासदारपदी आहेत.