नवी दिल्ली : भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंचं पुढचं पाऊल काय असणार याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. 'एबीपी माझा'ला मिळालेल्या माहितीनुसार नाना पटोले इतर कुठल्या वाटेने जाणार नाहीत, तर लवकरच त्यांचा काँग्रेस पक्षात थेट प्रवेश होणार आहे.


नाना इतर कुठल्या पक्षात थेट प्रवेश करण्याऐवजी वेगळी संघटना काढणार का, की याआधी ते जसे अपक्ष लढलेले आहेत तसेच लढत राहणार, याबद्दल अंदाज बांधले जात होते. मात्र नाना पटोले लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

भाजपची खासदारकी धुडकावल्यानंतर नाना पटोले हे राज्यभरात पश्चाताप यात्रा काढणार आहेत. हा दौरा संपल्यानंतर जानेवारी महिन्यातच त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतरची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आज त्यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्राताई महाजन यांची भेट घेतली. कधी कधी भावनेच्या भरात असे निर्णय घेतले जातात, त्यामुळे त्याबद्दलची खात्री करुन घेण्यासाठीची ही प्रक्रिया असते. लवकरच राजीनामा स्वीकारल्याबद्दलचं अधिकृत पत्रक लोकसभा सचिवालयाकडून जारी होऊ शकतं.

राहुल गांधी म्हणाले, " ओह, नाईस फेलो"

भाजपची खासदारकी धुडकावल्यानंतर नाना पटोले हे काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले होते. 11 डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये राहुल गांधींच्या एका सभेत व्यासपीठावर नाना पटोले होते. राजीनामा दिल्याच्या दिवशीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हेही नानांच्या भेटीसाठी निवासस्थानी पोहचले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दलच्या हालचाली सुरु आहेत यांचे संकेत मिळत आहेत.

सहसा अशी खासदारकी सोडून पक्षात येणाऱ्यांना लगेच राज्यसभा किंवा विधानपरिषदेची ऑफर दिली जाते. त्यानुसार राहुल गांधींनी नानांना तुम्हाला कुठलं पद हवंय असं विचारलं. मात्र त्यावर मी काही मागण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलोय. तुमच्या सोबत प्रचार करेन, शेतकऱ्यांची ताकद मजबुतीनं उभी करण्यासाठी प्रयत्न करेन, असं उत्तर दिलं. त्यावर राहुल गांधींनी "ओह नाईस फेलो" असं म्हणत नानांचं कौतुक केलं. त्यामुळे आता नाना पटोलेंचा काँग्रेस प्रवेश नेमका कुठल्या मुहूर्तावर होणार याची उत्सुकता आहे.